युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम

जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे (क्रुसेडस्) म्हणतात.

धर्मयुद्धांना पाठिंबा

मध्ययुगात धर्मयुद्धाच्या कल्पनेने युरोपमधील सामान्य जनता भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झाली.

रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. यांसारख्या विविध कारणांनी युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला.

इ.स.१०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनिअस (तिसरा) याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड यांना मदतीस घेतले. तुर्षांनी त्यांचा पराभव केला. इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इ.स.११८७ मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. एकूण नऊ धर्मयुद्धे झाली. या धर्मयुद्धांचा शेवट झाला तरीही जेरूसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिला होता.

धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे

युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले, कारण पोप आणि यरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धांकडे संकुचित हेतूंनी पाहिले. धर्मावरील कमी झालेली श्रद्धा, युरोपातील विविध राजांमधील एकीचा अभाव, पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट, बायॉन्टाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या बाबी धर्मयुद्धांच्या अपयशास कारणीभूत होत्या.

धर्मयुद्धांचे परिणाम

काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धांमुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.

युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्लेबांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्राविण्य मिळवले. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले. हे कर थेट राजाच्या तिजोरीत जमा होऊ लागले.

युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोषाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी परिचित झाल्या. धर्मयुद्धांच्या काळात अरबांशी आलेल्या संपर्कातून युरोपीय राष्ट्रांचा अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांनी आत्मसात केले.

Popular posts from this blog

कायमधारा पद्धती : ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)