मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनमधील फरक…
जून महिना जवळ आला की सगळीकडे मान्सून कधी येणार अशी चर्चा सुरु होते. मे महिन्यात आलेला पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व आणि विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजेच मान्सून असेही हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जाते. पण हा मान्सून नेमका ओळखायचा कसा? त्या विशिष्ट पावसालाच मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. यातील नेमका फरक समजून घेण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला काही सामान्य निरीक्षणांवरुनही ओळखता येतो. काय आहेत ही निरीक्षणे पाहूयात… मान्सूनपूर्व पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मान्सूनमध्ये ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो. मान्सूनपूर्व पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मान्सूनमध्ये ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते. मान्सूनपूर्व पावसाचे ढग दाट असतात तसेच त्याची जाडी आणि उंचीही खूप असते. मान्सूनचे ढग तितके उंच नसतात....