होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement


होमरुल चळवळीची पार्श्वभुमी

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘होमरुल चळवळ’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ मानली जाते. सन १९०६ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्यातच आपला स्वार्थ आहे, असे मुस्लिम नेत्यांना वाटत होते. सन १९०९ मध्ये त्यांना विभक्त मतदारसंघ मिळाल्यामुळे ब्रिटिश आपले तारक आहेत असे वाटू लागले होते. परंतु ब्रिटिश सरकारने सन १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द केली, स्वाभाविकच ब्रिटिशांनी आपले स्वप्न भंग केला आहे असे मुस्लिम नेत्यांना वाटू लागले. सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ती पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय घेतला. या काळात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणावर नाराज असलेल्या मुस्लिम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर होमरुल चळवळीचा निर्णय घेण्यात आला.

होमरुल चळवळ

भारतीय स्वातंत्र्य चळवळीस नवचैतन्य निर्माण करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचे दृश्य स्वरुप म्हणजे होमरुल चळवळ होय. डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक व जोसेफ बॅप्टिस्थ यांच्या नेतृत्त्वाखाली भारतात ही चळवळ घडून आली. होमरुल लीगच्या विविध संघटना अस्तित्वात आल्या. परंतु ही चळवळ एकच होती. होमरुल चळवळीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अधिक गतिमान करण्याचे काम केले. मुंबई, कानपूर, अलाहाबाद, कलकत्ता व मद्रास या ठिकाणी होमरुल लीगच्या संघटना स्थापन झाल्या होत्या.

होमरुल म्हणजे काय?

‘होमरुल’ म्हणजे स्वराज्यप्राप्ती होय. आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार आपण प्राप्त करुन घेणे म्हणजे होमरुल होय. होमरुलची चळवळ ही मूळात आयर्लंडधील लोकांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी श्री. रेडांड यांच्या नेतृत्त्वाखाली आयरिश लोकांनी सुरू केलेली होती. श्रीमती ॲनी बेझंट याही जन्माने आयरिश होत्या. त्यांनी या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केलेले होते. भारत व आयर्लंड या दोन देशांची राजकीय समस्या सारखीच असल्याने आयर्लंडप्रमाणे भारतातही होमरुल चळवळ सुरू केली तर भारतीय लोकांत जागृती निर्माण होईल असे बेझंट यांना वाटत होते.

डॉ. ॲनी बेझंट

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ॲनी बेझंट यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १८४७ रोजी झाला. इंग्लंड व जर्मनीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. इंग्लंडधील आगपेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी त्या ठिकाणी चळवळ सुरू केली. सन १८९३ मध्ये त्यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत सहभाग घेतला. त्यावेळी स्वामी विवेकानंदानी केलेल्या भाषणामुळे त्या हिंदु धर्म व संस्कृतीकडे आकर्षित झाल्या. सन १८९३ मध्ये बेझंट भारतात आल्या. भारतात आल्यानंतर सन १८९३ ते १९१२ या काळात थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य केले. प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी बनारस येथे ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ स्थापन केले. दरम्यानच्या काळात त्यांनी ’??????’ ही संस्था स्थापन केली (१९१०). पुढे सन १९१३ मध्ये त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. राजकीय जीवनात कार्यरत असताना त्यांनी काँग्रेसकडे होमरुल चळवळ सुरू करावी अशी मागणी केली. परंतु काँग्रेसमधून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. भारताला स्वराज्याचे हक्क मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेऊन त्यांनी या विचाराच्या प्रसारासाठी मद्रास येथे सन १९१४ मध्ये ‘कॉन वील’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे वृत्तपत्र सुरू केले. सन १९१७ मध्ये बेझंट यांनी ’???????’ ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून भारतीय स्त्रीयांचा दर्जा उंचावण्यासाठी कार्य केले. डॉ. बेझंट यांनी १०० पुस्तके लिहिली व २०,००० पेक्षा जास्त व्याख्याने देऊन प्रबोधनाचे कार्य केले.

होमरुल लीगची स्थापना

डॉ. ॲनी बेझंट यांनी सन १९१५ मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने होमरुल चळवळीचा कार्यक्रम स्विकारावा अशी विनंती केली. परंतु या काळात काँग्रेस मवाळ गटाच्या ताब्यात असल्याने बेझंट यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळकांनी या चळवळीस पाठिंबा दर्शविला. यानंतर डॉ. बेझंट यांनी सप्टेंबर १९१६ मध्ये होमरुल लीगची स्थापना केली. कलकत्ता, मद्रास, कानपूर अलाहाबाद इत्यादी ठिकाणी होमरुल लीगच्या शाखा स्थापन झाल्या.

होमरुल चळवळ व लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांची सन १९१४ मध्ये मांडलेल्या तुरुंगातून सुटका केली. ब्रिटिश सरकार या काळात पहिल्या महायुद्धात गुंतलेले होते. परंतु भारतीय स्वातंत्र्य चळवळ मंदावलेली होती. पहिल्या महायुद्धातील भारतीयांच्या सहकार्याबद्दल ब्रिटिशांच्याकडून जास्तीत जास्त राजकीय हक्क मिळाले पाहिजे असे टिळकांना वाटत होते. राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ अधिक गतीशील झाली पाहिजे व हे काम काँग्रेस अंतर्गत व्हावे असे टिळकांना वाटत होते. डॉ. बेझंट टिळकांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आग्रही होत्या, परंतु फिरोजशहा मेहतांच्या विरोधामुळे असे करणे शक्य झाले नाही. टिळकांना राष्ट्रीय चळवळ अधिक गतीमान करण्याची गरज वाटत असल्याने डॉ. बेझंट यांची ‘होमरुल’ची संकल्पना उचलून धरली. २८ एप्रिल १९१६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या बैठकीत ‘होमरुल लीग’ची स्थापना केल्याचे घोषित केले व त्याचे कार्यालय पुणे येथे ठेवले. जोसेफ बॉप्टीस्टा यांना लगीचे अध्यक्ष नेमले व न. चि. केळकर यांना सचिव म्हणून घोषित केले. दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि. ल. करंदीकर इत्यादी मंडळी या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी होते.

होमरुल लीगची उद्दिष्टे

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला अधिक गती देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात राजकीय हक्कांची जाणीव निर्माण करणे, स्वयंशासनाची मागणी ब्रिटिशांपर्यंत पोहचवण्यासाठी संपूर्ण देशभर प्रचार करणे व स्वयंशासनाचे ध्येय पूर्ण होईपर्यंत सनदशीर मार्गाची चळवळ अधिक गतिशील करणे हे लीगचे उद्दिष्ट होते. होमरुल संबंधी आपली भूमिका विशद करताना टिळक म्हणतात की, ‘‘होमरुल किंवा स्वराज्याचे तत्त्व १९०६ सालीच काँग्रेसला मान्य झाले आहे. पण काँग्रस ही वर्षातून एकदा भरणारी असल्यामुळे या राष्ट्रीय ध्येयास व्यवस्थित रुप देऊन त्यासाठी जे प्रयत्न करावयास पाहिजेत, त्यासाठी काँग्रेसने अद्याप काही तजवीज केलेली नाही. ही तजवीज करणे हे होमरुल लीग किंवा हिंदी स्वराज्य संघाचे मुख्य काम होय. यात काँग्रेसला विरोध नाही, इतकेच नव्हे तर हिंदुस्थानातील निरनिराळया प्रांतात निरनिराळे स्वराज्य संघ निघाले तरी त्यांच्यामध्ये परस्पर विरोध होणे शक्य नाही.’’ ही बेझंट यांनीही आपल्या वृत्तपत्रात अशाच स्वरुपाची भूमिका मांडत होत्या. भारताला स्वराज्याचे हक्क मिळालेच पाहिजेत. होमरुल म्हणजे जबाबदार शासनपद्धती होय अशी बेझंट यांची भूमिका होती.

होमरुलचा प्रचार व प्रसार

लोकमान्य टिळक व डॉ. बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केल्यानंतर अल्पावधीत देशाच्या अनेक भागात लीगच्या शाखा स्थापन झाल्या. टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रातून होमरुल चळवळीचा प्रचार केला. सन १९१६ मध्ये देशव्यापी दौरा काढून होमरुल संबंधी आपली भूमिका मांडण्याचे काम टिळकांनी केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग होमरुल चळवळीकडे आकर्षित झाला. सन १९१६ मध्ये टिळकांनी स्थापन केलेल्या लीगचे १४००० सभासद होते तर ही संख्या सन १९१७ मध्ये ३३,००० वर गेलेली होती. सन १९१७ मध्ये लोकमान्य टिळकांनी होमरुल लीगचे नाशिक येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनानंतर लीगचे कार्यकर्ते संपूर्ण देशभर प्रचार व प्रसाराचे काम करु लागले. बॅ. जीना महमद अली, शौकत अली यांच्यासारखे मोठे नेतेही या चळवळीत सामील झालेले होते. पश्चिम भारतात या चळवळीचा फार मोठा प्रसार झाला.

होमरुल विरुद्ध ब्रिटिशांची दडपशाही

ब्रिटिश सरकार पहिल्या महायुद्धात गुंतलेले असताना उद्‌भविलेल्या होमरुल चळवळीची मुस्कटदाबी करण्यासाठी ब्रिटिशांनी दडपशाहीचे धोरण स्विकारले. ब्रिटिशांनी ही चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा जे लोक होमरुल लीगबाबत उदासीन होते तेही या चळवळीत दाखल झाले. लोकमान्य टिळक यांच्यावर मुंबई सरकारने खटला दाखल केला. या सुमारास डॉ. ॲनी बेझंट यांच्यावरही मद्रास सरकारने खटला दाखल केला. डॉ. बेझंट यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध केला. टिळकांचे दुसरे सहकारी बिपिनचंद्र पाल यांना पंजाब व दिल्ली येथे येण्यास प्रतिबंद केला. टिळकांच्यावर भरलेल्या खटल्यातून टिळक निर्दोष सुटले परंतु १५ जून १९१७ रोजी डॉ. बेझंट व बी. पी. वाडिया यांना अटक केली. त्यामुळे संपूर्ण देशात प्रक्षोभ निर्माण झाला. जनतेच्या वाढत्या प्रक्षोभामुळे अस्वस्थ झालेल्या गव्हर्नर जनरलने भारतमंत्र्यास कळविले की, ‘‘इंग्लंडने भारतास स्वराज्य द्यावे अशी मागणी टिळक व बेझंट करत आहेत. त्यांचा जबरदस्त प्रभाव जनमानसावर पडत आहे. राष्ट्रीय चळवळीपासून दूर असणारे उच्चभ्रूही यास पाठिंबा देत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे भारतास राजकीय अधिकार देण्याबाबतची घोषणा करणे होय.’’ लोकमान्य टिळकांनी डॉ. बेझंट बाई यांच्या सुटकेसाठी सत्याग्रह करणार असल्याचे कळल्यानंतर डॉ. बेझंट यांची सुटका करण्यात आली व वाढता असंतोष कमी करण्यासाठी मॉटेग्यू यांने २० ऑगस्ट १९१७ रोजी भारतास जबाबदार सरकार देण्याचे धोरण जाहीर केले.

होमरुल लीगचे परदेशातील कार्य

अमेरिका व इंग्लंडधील काही वृत्तपत्रे व नेत्यांनी होमरुल चळवळीस सहानुभूती दाखवली. त्यामुळे मद्रास प्रांतातील होमरुल लीगचे अध्यय सर सुब्रह्मण्यम अय्यर यांनी जून १९१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना पत्र पाठवून होमरुल चळवळीस मदत करण्याची विनंती केली. विल्सन यांनी जी युद्धतत्त्वे घोषित केलेली होती त्यामध्ये स्वयंनिर्णयाचे तत्त्व होते. या तत्त्वानुसार भारताचा स्वयंनिर्णयाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी अय्यर यांनी केली. हे पत्र वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे संसदेत ब्रिटनच्या धोरणावर टीका झाली. जुलै १९१७ मध्ये जोसेफ बॅप्टिस्टा यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टंडळ इंग्लंडला पाठविले. या शिष्टमंडळाने इंग्लंडचा दौरा करुन भारतीय स्वराज्याचा प्रश्न ब्रिटिश जनतेपुढे मांडला. सन १९१८ मध्ये टिळकांनी आणखी दोन शिष्टमंडळे इंग्लंडला पाठवण्याचे ठरविले. परंतु त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याने ते जाऊ शकले नाही. लोकमान्य टिळकांनी स्वत:च होमरुल चळवळीसाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. टिळक, न. चि. केळकर, दादासाहेब खापर्डे, बिपिनचंद्र पाल इत्यादी मंडळी इंग्लंडला जाण्यास निघाली. मात्र त्यांचे पासपोर्ट रद्द केल्याने मधून परत यावे लागले. टिळकांनी यानंतरही हार न मानता लाला लजपतराय, एस. एस. हार्डीकर व के. डी. शास्त्री यांना अमेरिकेस पाठविले. या नेत्यांनी भारतीय होमरुल चळवळीची भूमिका अमेरिकन जनतेसमोर मांडली. सॅन फ्रांन्सिस्को येथे होमरुल लीगची शाखा स्थापन केली व भारतीय स्वराजाच्या प्रश्नासंदर्भात अमेरिकन जनतेचा विश्वास संपादण्यात यश मिळवले. परिणामी भारतीय होमरुल चळवळीला जागतिक स्वरुप येण्यास मदत झाली. फ्रान्सचे पंतप्रधान क्लेेन्शो यांनाही टिळकांनी मग पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य प्राप्त करुन देण्यासंदर्भात प्रयत्न करावेत असे कळविले.

जोसेफ बॅप्टिस्टा व होमरुल चळवळ

लोकमान्य टिळकांचे विश्वासू सहकारी व होमरुल चळवळीचे खंदे पुरस्कर्ते म्हणून जोसेफ बॅप्टिस्टा ओळखले जातात. केंब्रिज विद्यापीठातून बॅप्टिस्टा यांनी कायद्याची पदवी घेतलेली होती. मूळचे हिंदू सारस्वत पाठारे असलेल्या बॅप्टिस्टा यांच्या कुटूंबियांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता. टिळकांच्या कार्यावर प्रभावित होऊन बॅप्टिस्टा टिळकांच्या कार्याकडे आकर्षित झाले. टिळकांचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली होती. टिळकांनी होमरुल लीगची स्थापन केल्यानंतर जोसेफ बॅप्टिस्टा यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. होमरुलचा प्रसार करण्यासाठी नंतर ते इंग्लंडला गेले. इंग्लंडध्ये भारतीय होमरुल चळवळीचे कार्य व प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत पोहचवण्यात व पार्लमेंटच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आले. जोसेफ बॅप्टिस्टा यांनी भारतीय मजूर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय मजूर संघाच्या स्थापनेमध्ये त्यांचाही मोठा सहभाग होता. मजूर वर्गाचा प्रतिनिधी, मजूरांच्या प्रश्नाबद्दल आस्था असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईमधील मंजूर संघाचे ते अध्यक्ष होते. ‘ईस्ट इंडिया’ नावाचे मासिक त्यांनी सुरू केलेले होते. टिळकांच्या मृत्युनंतर टिळक अनुयायांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी सक्रिय राजकारणात फारसा सहभाग घेतला नाही. टिळकांच्या अनुयायांनीच माझे राजकारण बुडविले असा त्यांचा आरोप होता.

होमरुल चळवळीचे परिणाम

  1. मवाळवादी नेते राजकारणापासून दूर फेकले गेले व जहालाचे वर्चस्व पुन्हा निर्माण झाले
  2.  भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे होमरुलमुळे टिळकांच्या हातात आली.
  3. राष्ट्रीय सभेनेही ब्रिटिशाकडे स्वराज्याची मागणी करण्यास सुरुवात केली.
  4. होमरुल लीगने परदेशात केलेल्या कामाच्या परिणाम स्वरुप नॉटिंगहॅम परिषदेत मजूर पक्षाने भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात यावे असा ठराव मंजूर केला.
  5. २० ऑगस्ट १९१७ मध्ये भारतमंत्री मॉंटेग्युने भारतात जबाबदार सरकार देण्याचे ब्रिटिश शासनाचे धोरण जाहीर केले.

होमरुल चळवळीच्या ऱ्हासाची कारणे 

होमरुल चळवळीने अल्पावधीत आपला प्रभाव निर्माण केला व महत्त्वपूर्ण कामही केले, परंतु ही चळवळ फार काळ चालू राहिली नाही. त्यांची कारणे पुढीलप्रमाणे,
  1. होमरुल लीगने केलेली वसाहतीच्या स्वराज्याची मागणी जहाल तरुणांना मवाळ स्वरुपाची वाटत होती. त्यामुळे त्यांच्यात निराशा पसरली.
  2. होमरुल चळवळीच्या शाखा फक्त भारतातील प्रुख शहरामध्ये स्थापन झाल्या त्यामुळे ही चळवळ सर्वसामान्यापर्यंत पोहचली नाही.
  3. होमरुल चळवळीवर ब्राह्मणांचा प्रभाव आहे असा प्रचार झाला त्यामुळे बहुजन समाज या चळवळीपासून बाजूला राहिला.
  4. राष्ट्रीय सभेचा होमरुल चळवळीला विरोध होता.
  5. लो. टिळकांच्या मृत्युनंतर महात्मा गांधीचा राजकीय जीवनात उदय झाला. गांधीजींचे नेतृत्त्व व सत्याग्रहाचे तत्त्व यामुळे होमरुल चळवळ बाजूला गेली.

Popular posts from this blog

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

कायमधारा पद्धती : ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

युरोपियनांचे भारतात आगमन