मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर | Marathwada Liberation Day 17 September
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर
स्वतंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला.
भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावाकडे निजामाने आणि कासीम रझवी याने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केले. याला उत्तर म्हणून भारतीय फौजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 सप्टेंबर 1947 रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणागती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन स्वातंत्र्यापासून सतत 13 महिने लढले गेले.
15 ऑगस्ट 1947 रोजी जरी आपला देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म 17 सप्टेंबर 1948 रोजीच झाला. स्वातंत्र्यानंतरही जवळपास 13 महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल 13 महिन्यांनंतर उजाडली.
निजामाचा धूर्त डाव होता की, 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता 'स्वतंत्र राष्ट्र' म्हणून घोषित करायचे, किंवा मग हैद्राबाद संस्थानचे पाकिस्तानात विलनीकरण करायचे आणि असे झाले असते तर, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश तयार झाला असता किंवा भारताच्या मधोमध पाकिस्तानचा हक्क राहिला असता. 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे हैदराबाद होते. निजामाने 27 ऑगस्ट 1947 रोजी आपले 'स्वातंत्र्य' घोषित केले. त्यानंतर, मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर 'जैसे थे' करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी संध्याकाळी 5 वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न भंग पावले. या लष्करी कारवाईला 'पोलिस ऍक्शन' असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे असणारा महाराष्ट्रातील मराठवाडाही स्वतंत्र झाला आणि निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन तेथेही भारतीय तिरंगा फडकला.
17 सप्टेंबर- मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस
मराठवाडयातील जनतेचा स्वातंत्र्यदिन. म्हणजे 15 ऑगस्टसारखाच मराठवाडयाकरिता हा दिवस असतो. मराठवाडा मुक्ती दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन झाली आणि हा दिवस मोठ्या उत्साहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये साजरा केला जाऊ लागला.
जसा ऑगस्ट क्रांती मैदानात शहीद स्तंभ आहे त्याचप्रमाणे मराठवाडयात औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीदिनाचा इतिहास चिरंतन राहावा या उद्देशाने मुक्ती स्तंभ उभा केला आहे. त्या मुक्तीस्तंभावर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ. विजेयंद्र काब्रा आदींच्या प्रतिमा चिरंतन स्वरूपात इतिहासाच्या साक्षी आहेत. आजच्या दिवशी सरकारी कार्यक्रम तेथे होतो. त्याचबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री तेथे पुष्पचक्र अर्पण करायला जातात आणि शासकीय पद्धतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा केला जातो. ज्या पद्धतीने आपल्यासाठी स्वतंत्रदिवस महत्वाचा असतो. तेवढाच मराठवड्यातील लोकांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन महत्वाचा असतो. या दिवसाला एक प्रकारे मराठवाड्यात अनन्यसाधारण महत्व आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद किंवा लातूरसारख्या थोड्याफार पुढारलेल्या भागात बाहेरून शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी आलेल्या लोकांना 17 सप्टेंबर किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसानिमीत्त काही खास माहीती नसते. त्यावेळी हा दिवस त्यांच्यासाठी एक वेगळाच आणि अनपेक्षित अनुभव देणारा ठरतो.